तुला स्वातंत्र्य आहे पोरी स्वयंप्रज्ञेने वाटचाल कर! ऐका बापाची आपल्या मुलीला वाढदीवसाच्या शब्दरुपी शुभेच्छा; त्यांच्याच शब्दात

वर्धा : प्रणेती ही अभिमान बाळगावा अशी माझी मोठी मुलगी, वयाच्या दहाव्या वर्षीच ‘निर्धार’ या एकपात्री प्रयोगाद्वारे सामाजिक प्रबोधन करून तिने चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या रसिकांची मने जिंकली. ती एकपात्रीच्या माध्यमातून महाराष्ट्र पादाक्रांत करणार होती. परंतु कोरोना आडवा आला तरीही आम्ही बापलेक हिम्मत हारलो नाही. शाळा कधी सुरू होते माहिती नाही पण, पोरगी स्वस्थ बसत नाही. गायन, नृत्य, चित्रकला यासारखे छंद जोपासत ती स्वयंप्रेरणेने वयाच्या बाराव्या वर्षी कोरियन भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्या हरहुन्नरी मुलीचा बाप होण्याचा अभिमान वाटतो. आज तिचा वाढदिवस तेराव्या वर्षात ती पदार्पण करीत आहे. प्रणेतीच्या वाढदिवशी कविता स्वरूपात माझ्या मंगलकामना व्यक्त करतो.
………………………………….

पोरी…

पोरी, तुझे आयुष्य तू जग तुझे निर्णय तू घे, या वासनांध जगात पाऊल जरा जपून टाक असे तुला मी मुळीच म्हणनार नाही. तू फक्त डोळ्यात अंगार ठेव, कारण भंगाराला केवळ अंगाराचीच भाषा समजते पोरी, तू पहा आकाशापल्याडचे स्वप्न नि शेंदूर फासलेल्या दगडाला ठोकरत तू चालत रहा तुझ्या ध्येयाच्या दिशेन, अंतिमतः तुझ्या ओंजळीत सूर्य, चंद्र, तारे असतील याची मी ग्वाही देतो. पोरी, म्हणतात आयुष्य एक रंगमंच आहे. पण मी म्हणतो आयुष्य एक युद्धभूमी आहे
इथे क्षणाक्षणाला तुला करावे लागेल युद्ध आणि पावलापावलावर भेटतील तुला तुझ्या कर्तृत्वाला पराभूत करू पाहणारे पुरातन शत्रू, म्हणून पोरी तू धम्मग्रंथातील आयुधे परजून समरांगणी पाऊल ठेव जिद्दीने तेव्हा अस्तित्वात नसणारा स्वर्ग सुद्धा, तुझ्या पायाशी लोळत असेल याचीही ग्वाही मी देतो.
पोरी, मला नकोय तुझ्या वाट्याला इतिहासाचे दुःख, मला पहायचं आहे तुला जग जिंकताना म्हणून पोरी तू इतके ध्यानात ठेव तुझ्या मनगटात ताकद असू दे आकाश वाकविण्याची आणि असू दे सदैव तुझा मेंदू जागृत अगं, जागृत मेंदूनेच इतिहास घडविला, हे तू विस्मरू नकोस
पोरी, तू वाढते आहे वयाने, बुद्धीने आणि अंगाने सुद्धा
तरी इतर बापांसारखी मी चिंता करणार नाही तुझी तुला स्वातंत्र्य आहे पोरी स्वयंप्रज्ञेने वाटचाल करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे पोरी वाटेत येणाऱ्या खाचखडग्यांना आत्मविश्वासाने तुडविण्याचे तुला स्वातंत्र्य आहे पोरी तुझ्या स्वप्नांच्या आड येणाऱ्या नकारार्थी पर्वतांना स्वकर्तृत्वाने पोखरण्याचे. पोरी, अश्रूंनी तुझा रस्ता अडवला तर तुझ्या डोळ्यातील तप्त लाव्हा ओत त्यावर आणि वाटचाल कर सूर्याच्या दिशेने, पोरी, तुला तुझेच नाही तर इतरांचेही आयुष्य फुलवायचे आहे. म्हणून तू यशोधरेच्या विश्र्वकल्याणी करुणेची आग हो जिजाऊच्या स्फूर्तिदायक स्वप्नांची बाग हो, तू हो सावित्रीच्या ज्ञानसागराची अभंगगाथा तू फक्त टेकव सूर्य घडविणाऱ्या रमाईच्या पायाशी माथा.

राजेश डंभारे
९५८८६८१७३५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here