चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे आर्वी तालुक्यात होणारा बालविवाह रोखला! पालकांना दिली समज; जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कार्यवाही

वर्धा : आर्वी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनकडून प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जिल्हा बाळ संरक्षण कक्षाने गावात जाऊन होणारा बालविवाह थांबवून बालिकेच्या आई-वडीलांना समज दिली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनने जिल्हा बाल संरक्षण कक्षाला दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी गावात जाऊन बालिकेच्या आई-वडीलांना गाव बाल संरक्षण समितीपुढे हजर केले. तसेच त्यांना समज देऊन जबाबनामा लिहून घेतला. ही कार्यवाही करताना बालिकेचे आजी-आजोबा. बहिण आणि गावातील गाव बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी, कोतवाल, चाईल्ड लाईनचे चमू, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यवाहीकरिता आर्वीचे तहसीलदार यांच्यासह आर्वी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक चहेर, आर्वीच्या एकात्मिक बाल विकास अधिकारी ललिता आसटकर यांचे सहकार्य मिळाले. वेळीच माहिती मिळाल्याने बालविवाह रोखण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here