
वर्धा जिल्ह्यातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सवर आजही मृत्यूचा खेळ सुरूच असून, प्रशासनाकडून केवळ दिखावूपूर्ण उपाययोजना केल्या जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दररोज भीषण अपघात घडत आहेत, निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत; मात्र या गंभीर प्रश्नावर प्रशासनाची भूमिका केवळ सूचनाफलक लावा आणि जबाबदारी झटका इतकीच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात अधिकृतरीत्या ३२ ब्लॅक स्पॉट्स घोषित करण्यात आले आहेत. ही ठिकाणे अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनालाच मान्य आहे. तरीही या ठिकाणी आजपर्यंत प्रभावी सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नाही. रस्त्यांवर वेगमर्यादा नियंत्रणाची कोणतीही ठोस यंत्रणा नाही, रात्री अपुरी प्रकाशव्यवस्था आहे, तुटलेले डिव्हायडर, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, रिफ्लेक्टिव्ह मार्किंगचा अभाव आणि महामार्गांवर मोकाट जनावरांचा वावर अशा अनेक गंभीर समस्या कायम आहेत. परिणामी दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नावर माध्यमांमधून आवाज उठल्यानंतर संबंधित विभाग अचानक हालचालीला लागले. काही ब्लॅक स्पॉट्सवर “Accident Prone Area” असे सूचनाफलक लावण्यात आले. मात्र नागरिकांच्या मते, ही कारवाई म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. कारण जिथे प्रत्यक्ष सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, तिथे फक्त बोर्ड लावून प्रशासन स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, दररोज अपघात होत असताना फक्त फलक लावून जीव वाचणार आहेत का? अपघात रोखण्यासाठी स्पीड कंट्रोल यंत्रणा, सीसीटीव्ही, योग्य सिग्नल व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, रिफ्लेक्टिव्ह कॅटआय, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण अत्यावश्यक आहे. मात्र या मूलभूत उपाययोजनांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक मोठ्या अपघातानंतर अधिकारी घटनास्थळी भेट देतात, बैठका घेतल्या जातात, चौकशीचे आदेश दिले जातात; मात्र काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
३२ ब्लॅक स्पॉट्स की ३२ मृत्यूचे सापळे?
जिल्ह्यातील ३२ अपघातप्रवण ठिकाणांवर आजही कोणत्याही प्रकारच्या प्रभावी सुरक्षाव्यवस्था नाहीत. रात्री अंधार, वेगावर नियंत्रण नाही, रस्त्यांवर खड्डे, तुटलेले डिव्हायडर आणि मोकाट जनावरांचा वावर यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे ब्लॅक स्पॉट्स आता अपघातप्रवण क्षेत्र नसून थेट “मृत्यूचे खुले सापळे” बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग झोपेत का?
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सवर दररोज अपघात होत आहेत, निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग अजूनही सुस्तच असल्याचे चित्र आहे. ३२ अपघातप्रवण ठिकाणे अधिकृतरीत्या घोषित असूनही अनेक ठिकाणी साधी सुरक्षाव्यवस्थाही नाही. रस्त्यांवर खड्डे, तुटलेले डिव्हायडर, अंधार आणि भरधाव वेगामुळे मृत्यूचे सत्र सुरूच आहे. अपघातानंतर अधिकारी पाहण्या करतात, बैठका घेतात; पण प्रत्यक्ष काम मात्र शून्यच. घाईघाईने फलक लावण्यात आले, मात्र नागरिकांच्या मते हा केवळ दिखावा आहे. “जीव गेल्यावरच राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.


























































