Home ◼️ संपादकीय मामा-भांजा दर्ग्याजवळ भीषण साखळी अपघात ; एसटीच्या धडकेत रोलरचे दोन तुकडे ;...

मामा-भांजा दर्ग्याजवळ भीषण साखळी अपघात ; एसटीच्या धडकेत रोलरचे दोन तुकडे ; दुचाकीस्वारासह चालक गंभीर

पवनार : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनारजवळील मामा-भांजा दर्गा परिसरात शुक्रवारी (दि.२२) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील एसटी बसने रोड रोलरला मागून जोरदार धडक दिल्याने रोलरचे दोन तुकडे झाले. या भीषण साखळी अपघातात पवनार येथील युवकासह बस चालक गंभीर जखमी झाले असून बसमधील आणखी काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 14 एलएक्स 8939 क्रमांकाची एसटी बस नागपूरकडून नांदेडकडे जात होती. दरम्यान, पवनार येथील मामा-भांजा दर्ग्याजवळ बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने समोरील रोड रोलरला मागून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा अंदाज चुकला आणि बस थेट रोड रोलरवर जाऊन आदळली.

धडक इतकी जबरदस्त होती की रोड रोलरचे दोन तुकडे झाले. याचवेळी पवनार येथील प्रीतम बोरकर (वय २६) हा दुचाकीने वर्धेकडे जात असताना या अपघातात सापडला. रोलरची धडक दुचाकीला बसल्याने प्रीतम बोरकर गंभीर जखमी झाला. अपघातात बस चालकालाही जबर मार लागला असून बसमधील चालकाच्या शेजारी बसलेले दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सर्व जखमींना तातडीने सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमधील इतर प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मामा-भांजा दर्गा परिसरातील या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा आणि सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!