
हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे शुक्रवारी रात्री भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हैदराबाद आउटर रिंग रोड (ORR) वर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला जोरदार धडक दिली.
लॉरीवरील माल सुरक्षित करण्यासाठी चालकाने वाहन थांबवून दोऱ्या आवळण्याचे काम सुरू केले होते. त्याच वेळी मागून आलेल्या कारने लॉरीवर आदळल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील सात जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा आणि तीन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक तपासानुसार, हे कुटुंब यादद्री-भुवनगिरी जिल्हा येथील मंदिरात देवदर्शन करून सनतनगर येथील घरी परतत होते. दरम्यान, वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.



























































