
वर्धा : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि सर्वसमावेशक विकास धोरणामुळे महाराष्ट्र आज प्रगतीशील राज्य म्हणून ओळखला जात आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त वर्धा येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, शेती, सिंचन, ऊर्जा, रोजगार व उद्योग क्षेत्रात राज्याने भक्कम कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षात ५५ हजार शेतकऱ्यांना ८८८ कोटी रुपयांचे पिककर्ज वितरित करण्यात आले असून यावर्षी ११०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनांद्वारे जिल्ह्यातील १.२९ लाख शेतकऱ्यांना १२९ कोटी रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले.
ऊर्जेचा भार कमी करण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ अंतर्गत ८२ हजार शेतकऱ्यांना १४३ कोटी रुपयांची वीज बिल माफी देण्यात आली आहे. तसेच बोर व धाम प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेसाठी ४२९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रात ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ अंतर्गत १०७२ उद्योगांना २४ कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला असून ८५० उद्योग कार्यान्वित झाले आहेत. युवकांना रोजगारनिर्मितीसाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ राबविण्यात येत असून ५७६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातही जिल्हा पुढे जात असून ९०० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन व ट्रेनिंग सेंटर’ उभारण्यात येत आहे. न्याय व्यवस्थेसाठी वर्ध्यात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्रासाठी ११.९७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही जिल्ह्यात मोठी चळवळ उभी राहिली असून १.४२ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘वर्धिनी मॉल’ व तालुका विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण केले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
























































