Home ◼️ संपादकीय सोशलिस्ट चौकात रोज उभा राहतो ‘उदरनिर्वाहाचा जुगार’; घाम गाळणाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचीच रांग...

सोशलिस्ट चौकात रोज उभा राहतो ‘उदरनिर्वाहाचा जुगार’; घाम गाळणाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षेचीच रांग ! अनिश्चिततेत जगणारे आयुष्य

राहुल खोब्रागडे

वर्धा : शहरातील सोशलिस्ट चौक येथे दररोज सकाळी एकाच वेळी आशा आणि हतबलतेचे चित्र उभे राहते. पहाटेपासूनच गावागावांतून शेकडो नव्हे तर हजारो मजूर या चौकात जमतात. हातात कामाची साधने, डोळ्यांत अपेक्षा आणि मनात एकच प्रश्न आज काम मिळेल का? दिवसाची सुरुवात आशेने होते; पण अनेकांसाठी शेवट निराशेनेच होतो.

दररोजच्या या गर्दीत पुरुषांप्रमाणेच महिलांचीही मोठी संख्या दिसते. कुणी लहान मुलांना घरी सोडून आलेले, तर कुणी कुटुंबाचा संपूर्ण भार खांद्यावर घेऊन कामाच्या शोधात उभे असते. सकाळी ठेकेदार, शेतकरी किंवा छोटे-मोठे व्यावसायिक येतात, आपापल्या गरजेनुसार काही मजूर निवडून घेऊन जातात. मात्र उर्वरित मजुरांसाठी दिवस हळूहळू ओझं बनत जातो. सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात उभं राहूनही काम मिळत नाही आणि शेवटी ‘आल्या पावली’ परतण्याची वेळ येते.

या चौकातील मजुरांचे आयुष्य पूर्णपणे अनिश्चिततेवर उभे आहे. कधी दिवसाला काम मिळते, तर कधी सलग अनेक दिवस हाताला काम लागत नाही. आज आहे, उद्या नाही हीच त्यांची वास्तवता बनली आहे. काम मिळालं तरी समाधान नाही, कारण मिळणारी मजुरी अत्यंत कमी आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही मजुरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरी पडते. अन्नधान्य, घरखर्च, औषधे, शिक्षण या सर्व बाबींमध्ये खर्च वाढलेला असताना मजुरांचे उत्पन्न मात्र तिथेच थांबलेले आहे.

महिलांची स्थिती अधिकच बिकट आहे. पुरुषांप्रमाणेच दिवसभर कष्ट करूनही त्यांना अनेकदा कमी मजुरी मिळते. घर आणि काम यांचा दुहेरी ताण सहन करताना त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचे प्रश्नही गंभीर होत आहेत. तरीही कुटुंबाच्या गरजांसाठी त्या रोज या चौकात उभ्या राहतात.

अनियमित रोजगारामुळे या मजुरांना बचत करणे अशक्य झाले आहे. रोज कमवा, रोज खा या चक्रात अडकलेल्या या कुटुंबांना संकटाच्या काळात कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. अनेक मजूर सावकारांच्या कचाट्यात सापडले असून त्यातून बाहेर पडणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. काम नसलेल्या दिवसांमध्ये घरातील चूल पेटवणेही मोठे आव्हान ठरते.

दरम्यान, या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना मजुरांमध्ये तीव्र आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दररोज इतक्या मोठ्या संख्येने मजूर कामाच्या प्रतीक्षेत उभे राहतात, तरीही त्यांच्या रोजगारासाठी ठोस योजना, किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी किंवा सामाजिक सुरक्षेची हमी याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही.

कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशलित चौकातील हे चित्र अधिकच अस्वस्थ करणारे आहे. एका बाजूला कामगारांच्या सन्मानाच्या घोषणा होत असताना, दुसऱ्या बाजूला हजारो मजूर रोज कामासाठी रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतत आहेत. सोशलित चौकातील ही गर्दी केवळ काम शोधणाऱ्या लोकांची नाही, तर ती ग्रामीण आणि शहरी श्रमिक व्यवस्थेतील असमतोलाची जिवंत साक्ष आहे. जोपर्यंत या मजुरांना स्थिर रोजगार, योग्य मजुरी आणि सामाजिक सुरक्षा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या आयुष्यातील हा ‘उदरनिर्वाहाचा जुगार’ असाच सुरू राहणार, हेच या विदारक वास्तवातून स्पष्ट होत आहे.

कटू वास्तव…

दररोज पहाटेपासून मजूर कामाच्या शोधात जमतात; मात्र सर्वांनाच रोजगार मिळतोच असे नाही. तासन्‌तास उन्हात उभं राहूनही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. मिळणारी मजुरी अत्यंत कमी असून वाढत्या महागाईसमोर ती अपुरी ठरते. महिलांनाही समान कष्ट करूनही कमी मजुरी मिळते. अनियमित रोजगारामुळे बचत अशक्य झाली असून कर्जाचा बोजा वाढतो आहे. रोज कमवा-रोज खा या चक्रात अडकलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

प्रतिक्रिया…

दिवसभर धावपळ करूनही कधी काम मिळतं, कधी मिळतच नाही. जे मिळतं त्यातून घरखर्च, औषधं, मुलांचं शिक्षण भागवणं अवघड होतं. कर्ज वाढत चाललंय आणि हातात काहीच राहत नाही. कष्ट करतोय, पण जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.

गोविंद वानखेडे, कामगार पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!