शेतामधील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळला! घातपाताचा संशय: पोलिसांनी चौकशी करण्याची गरज

केळझर : येथून गेलेल्या नागपूर महामार्गालगतच्या एका शेतातील विहिरीत चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारला सकाळी आठ वाजता उघडकीस आली असून सुजाता किशोर शेंदरे रा. केळझर असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत सुजाता शेंदरे ही मानसिक आजारी होती. बुधवारला मुलीस शौचालयास जाते असे सांगून रात्री आठ वाजता ती घराबाहेर पडली. उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. मुलीची प्रकृती बरी नसल्याने पती तिला उपचाराकरिता सेलूला घेवून गेले होते. तेथून परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी सुजाताचा शोध घेतला, परंतु कुठेही शोध लागला नाही.

गुरुवारला सकाळी जलसा ढाब्याच्या बाजुला असलेल्या उमेश रामाजी गायकवाड यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच पोलीस पाटील प्रकाश खंडाळे यांनी सेलू पोलिसांना याची माहिती दिली. मृताचे पती किशोर शोंदरे यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. अंगातील कपड्यावरुन मृतदेह सुजाताचा असल्याची ओळख पटली.

सेलू पोलीस स्टेशनचे जमादार विजय कापसे, रविंद्र रघाटाटे, गजानन वाट यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here