Home ◼️ संपादकीय ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या ; भोर तालुक्यात संतापाची लाट, आरोपीची गुन्हेगारी...

४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर हत्या ; भोर तालुक्यात संतापाची लाट, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अंतर्गत नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीविरुद्ध कठोर शिक्षेची मागणी जोर धरत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीकडे आली होती. दुपारच्या सुमारास ती गावातील मंदिर परिसरात खेळत असताना ६५ वर्षीय संशयिताने तिला आमिष दाखवत जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेणाने झाकल्याचाही प्रकार उघड झाला आहे. मुलगी बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती संशयितासोबत जाताना दिसल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. त्यानंतर गोठ्यात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावात मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचा यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, त्याने पूर्वी स्वतःच्या नात्यातील मुलीवर तसेच एका वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचे प्रकरण होते. काही वर्षांपूर्वी तो कारावास भोगून बाहेर आला होता.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच परिसरात रास्ता रोको आंदोलन करत “आरोपीला फाशी द्या” अशी जोरदार मागणी केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे समाजातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!