

वर्धा : संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारक महामानवांचे कार्य हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे त्यांना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त न करता त्यांच्या विचारांच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत व पत्रकार डॉ. उत्तम कांबळे यांनी केले.
स्थानिक नागरी बँक कॉलनीतील लुंबिनी बुद्ध विहार येथे क्रांतिबा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त भीमोदय जयंती उत्सव समिती व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समितीचे अध्यक्ष प्रमोद खेडकर होते. यावेळी राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. कांबळे यांनी संत तुकाराम, क्रांतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची व्यापकता अधोरेखित केली. आज जयंती उत्सवांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतो; मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या चळवळींमध्ये तो अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. यासाठी विशेष नियोजन करण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ धम्म प्रतिज्ञांचे महत्त्व, तसेच आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर समाजाची भूमिका यावर कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून, त्यांना समाधानकारक उत्तरे देत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लुंबिनी बुद्ध विहारतर्फे डॉ. कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश कांबळे यांनी केले. यावेळी डॉ. प्रदीप थुल, राजू ओरके, प्रा. महेंद्र डहाके, प्रभाकर भगत, अनिल पाटील, जगताप सर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रजनी सुरकार, सुनील ढाले, प्रा. मनोहर लांडगे, निखिल जवादे, शाहीर संजय भगत, प्रा. संघर्ष डहाके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.






















































