

झडशी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. या आरोग्य केंद्राच्या सभोवताली दारू विक्रेत्यांचा वेढा असल्याने आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातलगांना औषधांपेक्षा दारूचाच वास दरवळत असल्याचा अनुभव येत आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे दारूचा व्यवसाय फोफावल्याचा आरोप गावकऱयांकडून होत आहे.
सेलू तालुक्यात सालई (कला), दहेगाव (गो), हमदापूर, सिंदी (रे) व झडशी असे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असून एक ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु ह्ल्ली शासनाच्या दिशानिर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे कोविड या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व लघू आरोग्य केंद्राद्वारे नागरिकांना लस देण्याकरिता कार्यक्रम राबविला जात आहे.
परंतु झडशी प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने या आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण किंवा उपचाराकरिता येणाऱ्या रुग्ण व नागरिकांना आरोग्य केंद्रातील औषधींपेक्षा गावठी दारूचाच वास येत असल्याचे सांगितले जात आहे. या दारू विक्रेत्यांवर कुणाचाही वचक नसल्याने येथे मोफत उपचार घेण्यापेक्षा नागरिक खासगी रुग्णालयाकडे धाव घेत आहे. लगतच अंगणवाडी असल्याने बालमनावरही या अवैध दारूविक्रीचा दुष्पपरिणाम होत. असल्याने पालकांकडून या अवैध व्यवसायाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.