
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेने बैल चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत अज्ञात आरोपीला अटक केली असून, एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी तुळशीराम पंढरीनाथ गांजुडे (रा. आंजी मोठी, ता. जि. वर्धा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील दोन पांढऱ्या रंगाचे बैल २९ मार्चच्या सायंकाळपासून ३० मार्चच्या सकाळदरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशन खरांगणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवत मुखबिर व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रोशन गुलाबराव वंजारी (वय ३६, रा. आंजी मोठी, ह. मु. वर्धा) हा चोरी केलेले बैल बोलेरो पिकअप (MH 40 Y 2048) मधून येळाकेळी मार्गे वर्ध्याकडे आणत असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी येळाकेळी- वर्धा रोडवरील इको पार्क परिसरात नाकाबंदी केली. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात दोन पांढरे बैल आढळून आले. चौकशीत आरोपीने बैल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून दोन बैल (₹७०,०००) बोलेरो पिकअप वाहन (₹६,००,०००) मोबाईल (₹१०,०००)
असा एकूण ₹६,८०,००० चा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन खरांगणा यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स.पो.नि. आशिषसिंह ठाकूर, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, पो.हवा. महादेव सानप, गोविंद मुंढे, पो.अ. विनोद कापसे व म.पो.अ. स्मिता महाजन यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.























































