
वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच हिमालयीन गिधाड (Gyps himalayensis) आढळून आल्याने जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या या पक्ष्याची नोंद झाल्याने प्रकल्पाच्या जैववैविध्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
शनिवारी (ता. २८) बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे हे कुटुंबीयांसह बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी गेले होते. यावेळी आकाशात उंच भरारी घेत घिरट्या घालणारा एक मोठा गिधाडसदृश्य पक्षी त्यांच्या नजरेस पडला. संशय आल्याने त्यांनी तत्काळ त्या पक्ष्याचे छायाचित्र टिपले व तज्ज्ञांशी संपर्क साधला. प्राथमिक स्तरावर जीवशास्त्रज्ञ दर्शन दुधाने यांनी हा पक्षी भारतीय गिधाड असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र अधिक खात्रीसाठी छायाचित्र पक्षीतज्ज्ञ डॉ. राजू कसंबे, डॉ. सचिन रानडे व शशांक नगराळे यांच्याकडे पाठवण्यात आले. सखोल पडताळणीनंतर सर्व तज्ज्ञांनी हा पक्षी अल्पवयीन हिमालयीन गिधाड असल्याचे स्पष्ट केले.
हिमालयीन गिधाड हे प्रामुख्याने उत्तर भारतातील हिमालयीन पट्ट्यात आढळणारे असून स्थलांतराच्या काळात अधूनमधून इतर भागात दिसून येते. मात्र वर्धा जिल्ह्यातील ही पहिली अधिकृत नोंद मानली जात असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या नोंदीमुळे बोर व्याघ्र प्रकल्प केवळ वाघांसाठीच नव्हे, तर विविध पक्षी व इतर वन्यजीवांसाठीही सुरक्षित अधिवास असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नैसर्गिक अन्नसाखळी, विस्तीर्ण जंगल पट्टा व शांत वातावरण यामुळे अशा दुर्मिळ प्रजाती येथे आकर्षित होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, या महत्त्वपूर्ण नोंदीबद्दल डॉ. बाबाजी घेवडे यांचे बहार नेचर फाउंडेशनसह पर्यावरणप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात अशा नोंदींचे दस्तऐवजीकरण अधिक सक्षमपणे करण्याची गरजही व्यक्त होत आहे.



























































