
पवनार : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार (ता. २) रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या नेतृत्वात ही रॅली उत्साहात पार पडणार आहे. सेवाग्राम रोडवरील हनुमान मंदिर परिसरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर बस स्थानक चौक, ग्रामपंचायत चौक, बाजार चौक तसेच आबाजी महाराज देवस्थान मार्गे प्रमुख मार्गांवरून ही रॅली मार्गक्रमण करणार आहे.
शोभायात्रेत ढोल-ताशा व बँड पथकांचा गजर, विविध नृत्य पथकांचे सादरीकरण, आकर्षक देखावे यामुळे उत्सवी वातावरण रंगणार आहे. यासोबतच लाठी-काठीचे प्रात्यक्षिक आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषेत बालकलाकारांचे सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरणार आहे. या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

























































