
वर्धा : मैत्रिणीकडे अभ्यासाकरता गेलेल्या चिमुकलीचा बाथरूम मधील स्विचला हात लावताच विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नालवाडी परिसरातील गजानन अपार्टमेंट येथे बुधवारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास घडली. आरोही रामटेके वय १३ वर्षे रा. नालवडी असे शॉक लागून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
आरोही ही ‘स्कूल ऑफ ब्रिलियंस’ ची सातव्या वर्गातील हुशार विद्यार्थिनी होती. सदैव प्रथम क्रमांक मिळवणारी, आईची अत्यंत लाडकी मुलगी, मित्रमैत्रिणींसाठी आदर्श होती. बुधवारी दुपारी अभ्यासासाठी मित्रीकडे गेल्यानंतर बाथरूममध्ये गेली असताना बोर्ड वरील स्विच ऑन करताना तिला विजेचा जोरदार धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, बाथरूमच्या स्विच बोर्डमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी लावलेले प्लग तिच्या अंगावर पडल्यामुळे जोरदार करंट लागला. शरीरावर काळसर रंग पडल्याचे प्राथमिक निदान दर्शवते की विजेचा शॉक तिच्या मृत्यूचे कारण आहे. तिला तातडीने साहू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण सावंगी रुग्णालयात जाण्याच्या मार्गात तिची प्राणज्योत मावळली. सायंकाळी ६ वाजता रुग्णालयाने तिचा मृत्यू अधिकृतपणे जाहीर केला.
परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे रामटेके कुटुंब, नातेवाईक आणि शाळेतील मित्रमैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे. ही घटना सर्वांनाच इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करताना काळजी घेण्याचे महत्त्व पुन्हा आठवण करून देते. विजेच्या उपकरणांचा वापर करताना काटेकोर दक्षता घेणे किती आवश्यक आहे, हे या हृदयद्रावक घटनेतून स्पष्ट झाले आहे. एका हसत्या-खेळत्या मुलीचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.



























































