
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचा २९ वा स्थापना दिनोत्सव ७ ते १० जानेवारीदरम्यान विविध शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. ८ जानेवारी रोजी सकाळी ध्वजारोहणानंतर ११ वाजता मुख्य स्थापना दिन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाईन प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा असतील.
स्थापना दिनाच्या निमित्ताने ७ ते १० जानेवारीदरम्यान बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन परिसरात राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता लेखिका डॉ. क्षमा कौल यांच्या हस्ते होणार असून लेखक डॉ. भूषण भावे उपस्थित राहतील. याच कालावधीत उत्तर प्रदेश हिंदी संस्था, लखनऊ व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय साहित्यातील एकात्मता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मेजर ध्यानचंद क्रीडा मैदानावर अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कलाकारांकडून मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता याच मैदानावर फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी सांगितले की, विकसित भारताच्या संकल्पनेत युवा शक्तीची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबवत आहे. ही माहिती नागार्जुन अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी कुलसचिव कादर नवाज खान यांनी नागरिक व हिंदीप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.




























































