
वर्धा : शहरातील अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाका दाखवत मोठी कारवाई केली आहे. परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल ₹7.81 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PSI सवाई हे त्यांच्या पथकासह शहरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिल्वर रंगाची स्विफ्ट कार (MH 32 Y 2541) ही देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करत आहे.
या माहितीवर तातडीने सिद्धार्थनगर परिसरात नाकेबंदी करण्यात आली. काही वेळातच संशयित कार दिसताच पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने गाडी पळवली. पोलिसांनी पाठलाग करून अखेर लक्ष्मीनगर आलोडी परिसरात कार उभी अवस्थेत मिळवली, मात्र आरोपी पसार झाला.
पंचासमक्ष कारची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपनींच्या विदेशी दारू व बिअरच्या 25 पेट्या (किंमत ₹2,40,000), टॅंगो पंच कंपनीच्या 90 एमएलच्या 15 निपा (किंमत ₹1,500), असा एकूण ₹2,41,500 रुपयांचा अवैध दारू साठा मिळून आला. त्यासोबतच ₹5,40,000 किंमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट VDI कार देखील जप्त करण्यात आली. एकूण ₹7,81,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष ताले व प्रभारी निरीक्षक अजय भुसारी यांच्या देखरेखीखाली PSI विशाल सवाई आणि त्यांचे पथक, शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, अक्षय सावळकर, वैभव जाधव, श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे आणि अभिषेक मते यांनी केली.

















































