कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

वर्धा : चार मित्र कामाची बोलणी करण्याकरिता वेळा येथून परत येत असताना त्यांच्या कारला जबर अपघात झाला. यात तिघांचा जागीत मृत्यू झाला असून, अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. चार) अल्लीपूर-धोत्रा महामार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ रात्री घडली. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये गौरव गावंडे (वय ३२, रा. अलमडोह), निशांत वैद्य (वय ३५, रा. चानकी) आणि वैभव शिवणकर (वय २८, रा. अल्लीपूर) यांचा समावेश आहे. अल्लीपूर येथील भूषण शिवदास वडनेरकर (वय २८) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव गावंडे हा मुंबईहून आपल्या गावी आला होता. त्याला घेण्यासाठी भूषण वडनेरकर हा निशांत वैद्य, वैभव शिवणकर यांच्यासह त्याच्या एमएच ४९ यू ०२७५ क्रमांकाच्या कारने धोत्रा चौकात गेला.

येथून गौरव याला घेऊन मित्रांसह ते कारने अल्लीपूरच्या दिशेने निघाले. कार एकुर्ली फाट्याजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३२ एके ६१११ क्रमांकाच्या ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात गौरव व निशांत जागीच ठार झाले. जखमी भूषणने स्वत:ला सावरत आपल्या वडिलांना फोनवरून अपघाताची माहिती दिली.

त्यानंतर नथ्थू वडनेरकर आणि त्यांचा मुलगा मयूर घटना स्थळी पोहोचले. अपघातची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. मयूरने भूषण आणि वैभवला सावंगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान वैभवचाही मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी आरोपी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वाहनातील धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर प्रचंड मोठा आवाज झाला. तसेच कारचे तुकडे होत हवेत उडाले. या अपघातात मृतांमध्ये दोघे फोटोग्राफर होते. यामुळे आज जिल्ह्यातील काही फोटोग्राफर मंडळींनी त्यांची प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here