

सेलू : तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. गजानन शंकरराव गोठे (35) रा. दहेगाव गोसावी, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय भाऊराव चावरे (60) रा. सेलू हे खासगी कामासाठी आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच 32, एसी 6541) सेलूच्या कार्यालयात आले होते. वाहन तहसील कार्यालयासमोर उभे करून कामासाठी गेले होते. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने लांबविली.
काम आटोपल्यानंतर विजय चावरे हे गाडी असलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला बराच शोध घेतला, पण गाडीचा पत्ता लागला नाही. याची तक्रार सेलू ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी गजानन गोठे याला अटक केली. त्याच्याजवळून एक जुनी फॅशन प्रो गाडी (क्रमांक एमएच 32, एसी 6541, किंमत 50 हजार) जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे ना.पो.कॉ. कपिल मेश्राम, सचिन वाटखेडे, नारायण वरठी यांनी केली.