
वर्धा : पहाटेच्या मंद वाऱ्यात मंदिरे खुली होताच “जय जय राम कृष्ण हरी…” च्या मंगलध्वनींनी वातावरण दुमदुमून जाते. टाळ, मृदंग, पखवाजाच्या तालावर वारकरी भक्त डोक्यावर मावळी टोपी आणि शुभ्र पोशाख परिधान करून प्रभातकाळी काकड आरतीचे सूर छेडतात. या भक्तिमय क्षणांनी तालुक्यातील अनेक गावांतील देवळांमध्ये दररोज पहाटेचं वातावरण अवर्णनीय बनतं.
वारकरी परंपरेत कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासात निद्रिस्त अवस्थेत असलेल्या भगवान विष्णू अर्थात पांडुरंगाला जागविण्यासाठी ‘काकड आरती’ ही भक्तिभावाने केली जाणारी आराधना आहे. नवरात्रीनंतर कोजागरी पौर्णिमेपासून ते दिवाळीनंतरच्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा संपूर्ण महिना विठ्ठल मंदिरांमधून “हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल”चे सूर दुमदुमत असतात.
वाढत्या शहरीकरणाच्या काळात लुप्त होत चाललेल्या धार्मिक परंपरा जपण्यासाठी काही भक्त अजूनही अखंड सेवा देत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासूनच वयोवृद्ध मंडळी, महिला आणि लहान मुले मंदिरात जमू लागतात. काकड आरतीपूर्वी हरीची भजने, गौळणी आणि अभंग गात भक्त विठ्ठलाला जागे करतात. मंदिराचा गाभारा “ज्ञानोबा माउली, तुकाराम!” च्या जयघोषांनी भरून जातो.
तुपात भिजवलेल्या कापसाच्या वातीच्या ज्योतीला काकडा म्हणतात. या काकड्याची आरती विठ्ठलाला ओवाळली जाते, आणि त्यावरूनच ‘काकड आरती’ हा शब्द रूढ झाला आहे. फुलांच्या पाकळ्यांनी सजविलेल्या थाळीत पेटविलेली काकड्याची ज्योत, धूप, दीप आणि मंत्रजप यांच्या संगतीने वातावरणात भक्तिभाव दरवळतो. आरतीनंतर विठ्ठलाच्या मूर्तीला फुलांनी दृष्ट काढली जाते आणि प्रसाद वाटपाने सकाळच्या भक्तिसोहळ्याची सांगता होते.
आळोडीतील हनुमान मंदिरात दोन दशकांची नित्य परंपरा
शहरालगतच्या आळोडी येथील हनुमान मंदिरात गेल्या २० वर्षांपासून नियमितपणे काकड आरती आयोजित केली जाते. लीलाधर गुरनुले महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा अखंड सुरु आहे. दिवाळीच्या काळात संपूर्ण महिनाभर येथील काकड आरतीला परिसरातील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पहाटे पाच वाजल्यापासून ते सकाळी सातपर्यंत सुरू राहणाऱ्या या आरतींना गावातील वातावरणच भक्तिमय बनते. फुलांच्या रांगोळ्यांनी सजलेले मंदिर, देवाच्या चरणी ठेवलेल्या दिव्यांच्या रांगांमधून झळकणारा प्रकाश, आणि तालावर गुंजणारा अभंग हे दृश्य पाहण्यासाठी दररोज अनेक भक्त उपस्थित राहतात. आरतीनंतर हरीनामाच्या गजरात भजन आणि अभंगावली सादर केली जाते.
भक्तांचा आत्मिक अनुभव
नोकरीतून निवृत्तीनंतर हरीभक्तीकडे वळलो. आळोडी येथील हनुमान मंदिरातील काकड आरतीमधून मिळणारं आत्मिक समाधान हेच आमचं रोजचं बळ आहे. ही परंपरा टिकवून ठेवणं ही आमची सेवा आहे, असे लीलाधर गुरनुले महाराज यांनी सांगितले.



















































