


पवनार : येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये लक्ष्मण बापूरावजी मांजरे (वय अंदाजे ५०) या व्यक्तीने आपल्या राहत्या घरात दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दुपारी घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मांजरे यांच्या पत्नी घराबाहेर गेल्या असताना त्यांनी एकटे असतानाच टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पत्नी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता, लक्ष्मण मांजरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. या दृश्याने त्यांचा पायाखालची जमीनच सरकली.
घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.लक्ष्मण मांजरे हे गावात शांत, मनमिळावू आणि मदतीस तत्पर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.