
वर्धा : रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोद्दार बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी करीत कारसह ३ लाख १३ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला. तसेच दारूविक्रेत्याला अटक केली. ही कारवाई २८ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. आकाश दीपक जयसिंगानी (३२, रा. पोद्दार बगीचा) असे अटक केलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास आरोपी आकाश जयसिंगानी याच्या निवासस्थानी छापा मारून तपासणी केली असता देशी, विदेशी दारूसाठा मिळून आला. आरोपीने दारुसाठा एमएच ३३ ए १५२४ क्रमांकाच्या कारमधून यवतमाळ, कळंब येथून वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी आणत असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारसह एकूण ३ लाख १३ हजार २०० रुफ्यांचा दारूसाठा जप्त करून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सचिन इंगोले, प्रमोद पिसे आदींनी केली. जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत दारूची अवैध विक्री होणार नाही याचा विडाच सध्या पोलिसांनी उचलला आहे.



















































