वीज पडल्यानी दोघांचा मृत्यू! दोघे जखमी; महाकाळ, कोपरा येथील घटना

वर्धा : बर्‍याच दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान सिंदी (मेघे, महाकाळ व कोपरा (चाणकी) या ठिकाणी वीज पडली. यामध्ये महकाळ आणि कोपरा (चाणकी) या ठिकाणी दोघांना जीव गमवावा लागला.

वर्धा शहरासह लगतच्या परिसरात गुरुवारी दुपारी जोरदार पावसाची सुरुवात झाली. साधारणत: अर्धा तास राहिलेल्या या पावसादरम्यान सिंदी (मेघे) परिसरातील एका मंदिरावर वीज पडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे मंदिराच्या कळसाचा भाग खचला आणि काळा पडला. तसेच महाकाळ शिवारात दुपारी पाऊस सुरू झाल्याने शेळ्या चारत असलेले विलास रामजी ठाकरे (४५) घराकडे निघाले. परंतु याच दरम्यान त्यांच्यावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृताची पत्नी ही त्यांच्यापासून काही. अंतरावर असल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

यासोबतच वर्धा तालुक्यातीलच कोपरा (चाणकी) लगतच्या दिंदोडा शिवारात काही मजूर सोयाबीनची पेरणी करीत होते. दुपारी विजेचा कडकडाट आणि पाऊस सुरू झाल्याने या मजुरांनी काम थांबविले. तेवढ्यात वीज पडून नीलिमा सुभाष निवल (४७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे दीर चंदू बाबाराव निवल हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या शेतात पाच व्यक्‍ती काम करीत होते. यात तिघे सुखरूप बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here