

साहूर : द्रुगवाडा येथील स्मशानभूमीच्या शेडवरील टिनपत्रे गायब असून, सध्या अंत्यसंस्कार नदीपात्राच्या काठावर केले जात आहेत. परिणामी, उन्ह-पावसात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या गाव तिथे स्मशान याप्रमाणे गावखेड्यापर्यत शासनाचे लाखो रुपये खर्च करून स्मशानभूमी व शेड बांधण्यात आले.
त्यातच अनेक ठिकाणी स्मशानभूमी सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना जिल्ह्यात एक गाव असेही आहे, ज्या ठिकाणी लोखंडी गजांचे स्मशानशेड आहे, पण त्यावरील टिनपत्रे पूर्णतः गायब आहेत. आजपर्यंत याकडे कोणी लक्ष दिले किंवा नाही, असा प्रश्न पडतो. पाचशे मीटरवर अंतरावर अमरावती जिल्ह्यातील हातुर्णा येथील स्मशानभूमी ही अत्यंत सुंदर अशी बनविली आहे. तेथील स्मशान भूमी त अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सभागृह मोठ-मोठे वृक्ष, त्या भोवताल सुंदर सिमेंटचे ओटे, त्यांची सजावट, रंगरंगोटी आदी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहे.
मात्र, वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या द्रुगवाडूयातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. उन्ह-पावसात अंत्यसंस्कार करायचे असल्यास या ठिकाणी अंत्यसंस्कार करणे अत्यंत जिकरीचे होते. कारण या शेडवर या आधी तरी टिनपत्रे होते काय, याचा शोध घेणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे नागरिकांना या शेडशेजारी अगदी नदीच्या पात्राला लागून पाच- दहा मीटरवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. याकडे कोणी लक्ष देईल का, शासन, प्रशासन व गाव पुढारी चिरनिद्रेत असल्यासारखी येथील स्थिती असल्याचे ग्रामस्थ सांगतात.