१ लाख ३३ हजारांचा माल जप्त! आंतरराज्यीय टोळी केली गजाआड; पाच गुन्हे उघडकीस

वर्धा : शहरासह लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरांसह दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करून अट्टल गुन्हेगारांची मध्य प्रदेशातील टोळी गजाआड केली. या चोरट्यांची पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खडकसिंग उर्फ राकेश गुंग उर्फ रामसिंग अलावा (४५, रा. ग्रामबराड), पारस रतन मंडाई (३०, रा. सिंगाचोरी) व वेलसिंग दुर्जन बामनिया भिल्ल (४५, रा. सिमलखेडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून, सर्व मध्य प्रदेशातील आहेत.

शहरातील लहानुजीनगर परिसरातील रहिवासी शेख बसीर शेख रज्जाक यांचे घर फोडून १ लाख २० हजार रुपये लंपास केले होते. त्यासोबतच त्याच इमारतीमधील नसीम अखतर शेख यांच्या घरून ५० हजार आणि सोबीया सय्यद आफताब अली यांच्या घरासमोर एम.एच.०५ ई.सी.२४१३ क्रमांकाची दुचाकी लंपास केली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चोरी गैलेल्या दुचाकीवर तिघेजण वर्ध्यावरून नागपूरकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने नागपूर गाठून आनंद टॉकजकडे जाताना तिघांनाही ताब्यात घेतले.त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीकरिता वापरात येणारे साहित्य आढळून आले. तसेच त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल हा वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे लक्षात येताच त्यांच्याकडील १ लाख ३३ हजार ३१० रुपयांचा मुद्देगल जप्त करण्यात आला. या आरोपींनी वर्ध्यात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांना यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातही अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्‍यता आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सौरभ घरडे, अशोक साबळे, निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, गजानन लामसे, स्वप्नील भारद्वाज, रणजित काकडे, हमीद शेख, चंद्रकांतबुरंगे, प्रमोद पिसे, राजेश तिवसकर, श्रीकांत खडसे, राजेश जयसिंगपुरे, मनिश कांबळे, रामकिसन इप्पर, जोपाल बावणकर, राकेश आष्टणकर, विकास अवचट, नवनाथ मुंढे, अमोल ढोबाळे, अखिल इंगळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here