
हिंगणघाट: तालुक्यातील येणोरा येथे पोलिसांवर झालेला गोळीबार अनैतिक संबंधाची धार असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली असून, दोन लाखाची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंड प्रैमवीरावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
बुधवार ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन संशयास्पद स्थितीत दुचाकीवर फिरणाऱ्या युवकांना जमादार कमलाकर धोटे यांनी अडवून विचारपूस केली असता एकाने कट्टा काढून धोटे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने बंदुकीतून गोळी चालली नव्हती. हे दोन्ही गुंड त्यावेळी पसार झाले होते.
याच गुंडांच्या शोधात पोलीस चमू आरोपींचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरायान पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड हे आपल्या चमूसह गुंडांच्या शोधात येनोरा येथे गेले. तेथे गुंडांनी लगड यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात स्वरक्षणार्थ लगड यांनीही गुंडांवर एक गोळी झाडली होती. यात कुणीही जखमी झाले नव्हते. तेव्हा पुन्हा एकदा ते दोन्ही गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी जिशान शैख ऊर्फ जितेंद्र महेश गुप्ता (२१) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशा दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केली असता या गोळीबार प्रकरणाला अनैतिक संबंधाची धार असल्याचे पुढे आले. येणोरा गावातील आशिष राऊत (२८) याचे येणोरा गावातील राजपाल नामक वयक्तीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय होता. राजपालने जानेवारी महिन्यात आशिष राऊत याच्या मागे कुर्हाड घेऊन धावला व जीवे मारण्याची धमकी दिली होती. जीवाच्या भीतीने आशिष राऊत हा गाव सोडून वरोरा येथे राहत होता. त्याने आरोपींसोबत संपर्क साधून सदर महिलेच्या पतीला जीवे ठार मारण्यासाठी दोन लाख रुपयाची सुपारी दिली होती.
११ ऑगस्ट रोजी आरोपींनी रेकी करून १२ ऑगस्ट रोजी राजपालला जीवे ठार मारण्याचा कट त्यांनी रचला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने हा डाव उधळल्या गेला. आता या गुन्ह्यात कलम १२० (ब), ११५ भादंविप्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील मास्टर माईंड आरोपी आशिष राऊत याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी हिंगणघाट न्यायालयाने जिशान शेख याला २० ऑगस्टपर्यंत व आशिष राऊत याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.




















































