गॅस सिलिंडरचा भडका! एक हजारांच्या उंबरठ्यावर; २५ रुपयांनी झाली दरवाढ: आता मोजावे लागणार ९११ रुपये

वर्धा : शासनाने उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून आता घराघरांमध्ये गॅस पोहोचविला आहे. त्यामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे. सध्या महागाईचा आलेख वाढता असतानाच याचा परिणाम गॅस सिलिंडरवरही झाला आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दरमहा २५ रुपयांनी वाढ होताना दिसत आहे. याही महिन्यात २५ रुपयांची दरवाढ झाल्याने ग्राहकांना ९११ रुपयांना सिलिंडर घ्यावा लागणार आहे. गेल्या वर्षीपासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सिलिंडर लवकरच एक हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्याने अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता महागाईचा मार सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्यांना जगणेही कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरात सिलिंडरच्या दरामध्ये अडीचशे रुपयांची दरवाढ झाली. यावर्षीही आठ महिन्यांत १६४ रुपयांची वाढ झाल्याने आता सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परंतु सिलिंडरशिवाय पर्याय नसल्याने आर्थिक तडजोड करून गरज भागवावी लागत आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा असून, या दरवाढीच्या भडक्याचा धूर येत्या निवडणुकांमध्ये कोंडी करणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

नाममात्र सबसिडी, भरमसाठ दरवाढ

– जानेवारी महिन्यामध्ये ७४६ रुपयांमध्ये मिळणारे घरगुती सिलिंडर ऑगस्ट महिन्यात तब्बल ९११ रुपयांना घ्यावे लागत आहे.
– सिलिंडरच्या दरम्यामध्ये मार्च महिन्यांत सर्वाधिक ७५ रुपयांनी वाढ झाली असून या महिन्यांत ८४६ रुपयांत सिलिंडर घ्यावे लागले. त्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरुच आहे.
– पूर्वी गॅस सिलिंडरवर शासनाकडून २०० ते २५० रुपये सबसिडी दिली जायचे, मात्र गेल्या दीड वर्षांपासून केवळ ४० रुपये नाममात्र सबसिडी दिली जात आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात ही सबसिडीही जमा होत नसल्याची ओरड होत आहे.

छोट्या सिलिंडरचे दर उतरले

– गॅस एजंन्सी मार्फत ५ किलो वजनाचे व्यावसायिक व घरगुती सिलिंडर तसेच १४.२ किलो वजनाचे घरगुती आणि १९ किलो वजनाचे व्यावसायिक सिलिंडर ग्राहकांना पुरविले जाते.
– सध्या १४.२ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या असून १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर ५ रुपयांनी कमी झाले आहे.
– तर ५ किलो वजनाच्या सिलिंडरचे दर ४९१.५० रुपयांवरुन ४८९ रुपये झाले आहे. त्यामुळे याही सिलिंडरच्या किंमती कमी
झाल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here