

तळेगाव : नजीकच्या काकडदरा येथील घराला अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. ही घटना बुधवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली असून जवळपास ६० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काकडदरा येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील रहिवासी जानराव गुळभेले यांचा परिवार बुधवारी नेहमीप्रमाणे शेतात मोलमजुरीकरिता गेले होते. अशातच सायंकाळच्या सुमारास गुळभेले यांच्या घराला आग लागल्याने नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी लागलीच घराकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परेतु या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले. यात त्यांचे ६० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
या आगीमध्ये गुळभेले यांच्या घरातील सर्वच साहित्य जळाल्याने त्यांचा परिवारा क्षणार्धात उघड्यावर आला आहे. आता छत हरविल्याने नव्याने सुरुवात करण्यासाठी त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी किसन कौरती यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बेताची परिस्थिती असलेल्या गुळभेले कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून, या परिवाराला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.