
वर्धा : नजीकच्या सुकळी (बाई) येथील शेतकरी सतीश ज्ञानेश्वर पोकळे (3१) यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. शेतकरी सतीश पोकळे हे सोमवारी सकाळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील विहिरी शेजारी असलेल्या पेटीतील कृषिपंपाचा स्वीच सुरू करण्यासाठी लोखंडी पेटीला हात लावला असता त्यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला. यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच सावंगी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.


























































