
दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी कायम असून, आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचं समोर आलं आहे.
आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे. शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता, अशी कबूली पकडण्यात आलेल्या आरोपीनं दिली आहे.
शेतकरी नेत्यांनी आरोपीला आंदोलनस्थळी पकडलं. त्यानंतर माध्यमांसमोर त्याला आणण्यात आलं. त्याचा चेहरा झाकलेला होता. “२६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केलं जाणार होतं. यासाठी आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्या व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं, तो स्वतः पोलीस आहे,” अशी खळबळजनक कबुली आरोपीनं दिली आहे.
असा होता कट
आरोपीनं संपूर्ण कटाचाही उलगडा केला. “आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहे. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांचा शोध घेण्याचं काम दिलं होतं,” असं आरोपीनं सांगितलं. “२६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांना रोखण्यात येईल. त्यानंतर शेतकरी थांबले नाहीत. तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. तर दुसरीकडे दहा जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करतील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहे. ज्यानं आम्हाला हे सांगितलं, तो पोलीस आहे. त्याचं नाव प्रदीप सिंह आहे. राई ठाण्यात आहे. तो नेहमी चेहरा झाकून भेटायला यायचा,” अशी माहिती आरोपीनं दिली




















































