

पवनार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पवनार येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन उत्साहात पार पडले. सकाळपासूनच गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. पंचशील बुद्ध विहार परिसरातून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या दुचाकींसह “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅली अण्णा भाऊ साठे नगर, बस स्थानक चौक, ग्रामपंचायत चौक, बाजार चौक मार्गे संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत पार पडली.
यावेळी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला, तर महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देत ही रॅली शांततेत आणि उत्साहात पार पडली. पवनार येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.


























































