
मुंबई : राज्यात गॅसच्या तुटवड्याची समस्या निर्माण होत असताना केंद्र सरकारने पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासाठी मार्च-एप्रिल या कालावधीसाठी सुमारे ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय (GR) जारी केला असून, त्यानुसार मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर ही चार प्रमुख शहरे वगळता राज्यातील उर्वरित भागांत रॉकेलचे वितरण केले जाणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शिधापत्रिकाधारक कुटुंबाला प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, रॉकेलच्या उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक तसेच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही रॉकेल दिले जाणार आहे. शिधापत्रिका नसल्यास ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला ग्राह्य धरला जाईल. स्थलांतरित मजुरांनाही केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळखपत्र सादर करून रॉकेल मिळू शकणार आहे. दरम्यान, रॉकेलचे वितरण रास्त भाव दुकानदार व परवानाधारक विक्रेत्यांमार्फत करण्यात येणार असून, गावात विक्रेता उपलब्ध नसल्यास जवळच्या गावातून पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



























































