
पवनार : धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांतून समाजात पवित्रतेचे संस्कार रुजतात. भक्ती, श्रद्धा आणि सेवा भाव यांचे बीज अशा कथांमधून लोकांच्या मनात पेरले जाते. त्यामुळे गावागावचे वातावरण सकारात्मकतेने भारलेले राहते. धर्म आणि समाजसेवा यांची सांगड घालणारी ही परंपरा आपल्या संस्कृतीचा आधार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. ना. पंकज भोयर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथीनिमित्त पवनार येथे आयोजित शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ताजी मेघे, कथावाचक सु. श्री. अंकिता खांडगे, श्रीकृष्ण मंदिरचे अध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, माजी सरपंच अजय गांडोळे, माजी उपसरपंच राहुल पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते जयवंत गोमासे, नितीन कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री भोयर म्हणाले की, या प्रकारच्या कथा-प्रवचनांमुळे केवळ श्रद्धा वाढत नाही, तर समाजात एकत्रतेचा आणि सौहार्दाचा संदेशही दिला जातो. प्रत्येक गावात भक्तीमय वातावरण निर्माण होतं आणि समाजातील चांगुलपणा वाढतो. अशा कार्यक्रमातून केवळ आपणच व्यस्त राहत नाही, तर गावांमध्ये एक वेगळं, शांततामय आणि पवित्र वातावरण निर्मितीचं कामही घडत असतं. मागील पंचवीस वर्षांपासून या भूमीत धार्मिक परंपरा सातत्याने जपली जात आहे. या भूमीचा गौरव म्हणजेच अध्यात्म, साधना आणि सेवा. आचार्य विनोबा भावे यांच्या कार्यामुळे या गावाला देशभर ओळख मिळाली आणि आता दत्ताजी मेघे यांच्या समाजसेवेने या भूमीचे नाव पुन्हा उजळले आहे. समाजसेवा असो वा आरोग्यसेवा, या ठिकाणचा वारसा पुढील पिढ्यांनी जोपासावा.
या आयोजनात तरुणांचा सहभाग उत्साहवर्धक आहे. मात्र कथा किंवा भागवताच्या काळात फटाके वाजविण्याचे प्रकार टाळावेत. भक्तीचा आनंद शांततेत घेणं हाच खरा धर्म आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा गोष्टींकडे अधिक सजगतेने पाहावं अशी आयोजकांना विनंती केली. ही भूमी संतविचारांनी पावन आहे. येथे श्रद्धा, सेवा आणि संस्कार यांची परंपरा अखंड सुरू राहो, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कथावाचक सु. अंकिताताई खांडगे यांनी आपल्या ओजस्वी शैलीत शिवमहापुराण कथा प्रवचनास प्रारंभ केला. त्यांच्या सुसंवादी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दुशांत खोडे, गजानन डुकरे, राहुल काळे, विनोद पेटकर, पवन डुकरे, बालू आदमाने, तुकाराम चंदनखेड, दशरथ चांदणखेडे, सतीश उमाटे, नरेंद्र बांगडे, विवेक बोरकर, दीपक खेलकर, चिंतामण भुजाडे, प्रमोद उमाटे, अतुल देवताडे, जयंत हिवरे आणि मंगेश उमाटे, प्रकाश चोंदे यांनी परिश्रम घेतले.



















































