साडीचा पदर फाडून महिलेने बांधले बच्चू कडूंना ‘कर्जमाफीचे बंधन’ ; महाएल्गार मोर्चात उसळला शेतकऱ्यांचा आक्रोश ! पवनारमध्ये भावनांचा उफाळा

पवनार : माझं बंधन कर्जमाफी झाल्यावरच सोडा! अशी विनवणी करत पवनार येथील महिला संगीता धाकतोड यांनी आपल्या साडीचा पदर फाडून माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हाताला बंधन बांधले आणि कर्जमाफीचे प्रतीकात्मक आश्वासन त्यांच्या हातात ठेवले. भावनांनी ओथंबलेला हा प्रसंग पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, तर जमलेल्या लोकांच्या घोषणांनी आकाश दणाणून गेले.

बच्चू कडू यांच्या ‘महाएल्गार यात्रे’चा ताफा पवनार मार्गे जात असताना, गावातील शेतकरी व महिलांनी मोठ्या संख्येने महामार्गावर गर्दी केली होती. कडूंच्या वाहनाचा ताफा थांबताच संगीता धाकतोड या महिलेने ट्रॅक्टरवर चढत थेट बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोच घेतली. आमच्या शेतकऱ्यांचं जीवन कर्जाच्या जंजाळात अडकलंय. आमची सुटका कर्जमाफीशिवाय होणार नाही, असं म्हणत तिने साडीचा पदर फाडून त्यांच्या हाताला बांधला.

या भावनावेगाने भरलेल्या क्षणाला बच्चू कडूंनीही प्रतिसाद दिला. त्यांनी तत्काळ महिलेचं नाव व गाव विचारलं आणि म्हणाले, “कर्जमाफी झाल्यावरच तुझ्याच हाताने हे बंधन सोडवेन. तोपर्यंत हे माझ्यावरचं शेतकऱ्यांचं वचन समजून ठेवतो. या संवादाने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आशा निर्माण झाली.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंना हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला व युवक जमले होते. पवनारसह लगतच्या सुकळी, झुंज, पळसगाव, सेवाग्राम परिसरातील शेतकऱ्यांनी कडूंच्या स्वागतासाठी एकत्रित रांगा लावल्या होत्या. कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी एकजूट झिंदाबाद, बच्चू कडू आगे बढ़ो अशा घोषणांनी वातावरणात जोश भरला.

पवनारमध्ये या यात्रेचं स्वरूप शेतकऱ्यांच्या दुःखाचा महाउद्गार झालं होतं. बोरी–तुळजापूर महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा पिकांचं नुकसान दाखवणाऱ्या फलकांसोबत अनेकांनी वाळलेली सोयाबीन व कपाशीची झाडं, केळीचे घड, अगदी ओलसर मातीतली शेंगंही हातात घेऊन सहभाग नोंदवला. “ही आमची खरी हकीकत आहे,” असं म्हणत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

पवनारमधील युवा शेतकरी राजू देवतळे, घनश्याम बोरकर, प्रमोद लांडे, रणजीत भांडवलकर, मोरेश्वर हुलके, किशोर देवतळे, अनुप चांदणखेडे, रणजीत भुरे, रामू घुगरे यांनी या मोर्चासाठी स्थानिक पातळीवर तयारी करून शेतकऱ्यांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली. पवनारहूनच जवळपास दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी नागपूरकडे ‘महाएल्गार यात्रेत’ सहभागी होण्यासाठी कूच केली. “या वेळी कर्जमाफी झाली नाही, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या वेदनेचं प्रतीक, हातात वाळलेलं पीक, डोळ्यात अश्रू

महाएल्गार यात्रेत सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी हातात वाळलेली सोयाबीन, कपाशीची झाडं, कोमेजलेली पिकं आणि पिवळी पडलेली केळी घेऊन मोर्चात सहभाग घेतला होता. “हेच आमचं जगणं आहे,” असं म्हणत त्यांनी शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला. पवनारसह आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती या मोर्चात दिसून आली. शेतकऱ्यांच्या या व्यथा, राग आणि आशेचा संगम म्हणजेच या दिवसाचं चित्र होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here