


वर्धा : वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस विभागासोबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), समृद्धी महामार्ग अधिकारी, नॅशनल हायवे अधिकारी, राज्य मार्ग अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व एसडीपीओ, पोलीस निरीक्षक व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी भूषवले. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, वाहतूक शाखेचे अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक जैन यांनी यावेळी सर्व विभागांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, अपघात टाळण्यासाठी फक्त पोलीस विभागाचे नव्हे तर सर्व संबंधित विभागांचे समन्वित प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्येकाने जबाबदारीने काम केले, तर जिल्ह्यातील अपघातांची संख्या निश्चितपणे घटेल. त्यांनी पुढे सांगितले की, अपघातप्रवण ठिकाणी त्वरित स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत, सूचना व वेगमर्यादा फलक ठळकपणे लावावेत, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, हेल्मेट वापर सक्तीने लागू करावी आणि त्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत, ती ताबडतोब पूर्ण करण्यात यावीत आणि खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, जेणेकरून अपघाताची शक्यता कमी होईल.
बैठकीत समृद्धी महामार्गावरील सूचना फलक, रस्ता संकेत व सुरक्षा उपाय यांवरही विशेष चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्व हायवे व राज्य मार्गांवर ठराविक अंतरावर वेगमर्यादा बोर्ड, वळणांवर प्रकाश व्यवस्था आणि रिफ्लेक्टर बसविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शाळा, गाव, वर्दळीच्या चौकांजवळील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना अत्यावश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक जैन यांनी नमूद केले.
अपघातानंतर जखमी व्यक्तींना तात्काळ प्रथमोपचार आणि रुग्णालयात पोहोचविण्याच्या सेवांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. अशा कार्यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना शासनाकडून मिळणाऱ्या बक्षीस योजनांची माहिती पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले. बैठकीच्या शेवटी अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.