शेतकरी पूरग्रस्तांच्या दुःखात महाराष्ट्र अंनिसचा सहभाग ; ‘एक उपवास सहवेदनेचा’ उपक्रमातून मदतीचा निर्धार ! वर्धा जिल्ह्यासह ३० जिल्ह्यांतून २०० प्रतिनिधींचा सहभाग

वर्धा : विदर्भ आणि मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या दुःखद प्रसंगात सहभागी होत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (मंअंनिस) कार्यकर्त्यांनी राज्य कार्यकारिणीत एक दिवस अन्नत्याग करून ‘एक उपवास सहवेदनेचा’ हा उपक्रम राबवला. याचबरोबर शेतकरी पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करून थेट बाधित भागात मदत पोहोचविण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला.

शनिवारी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे सेंच्युरी रेयाॅन क्लब हाऊस मध्ये समितीच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला सुरुवात झाली. यावेळी सेंच्युरी रेयाॅन ह्युमन रिसोर्स विभागाचे उपाध्यक्ष श्रीकांत गोरे यांच्या हस्ते पाण्यावर दिवा प्रज्वलित करून उद्घाटन झाले. मंचावर राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे, प्रधान सचिव रुकसाना मुल्ला, डॉ. ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार, विजय परब, आरती नाईक, शहाजी भोसले, डॉ. सुषमा बसवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील ३० जिल्ह्यांतील सुमारे २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सुरुवातीला पूरग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडत राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी संवेदनशील भूमिका मांडली. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकवेळच्या जेवणाचा त्याग करून पूरग्रस्तांसाठी उपवास केला. या उपक्रमातून वाचलेले पैसे तसेच कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त योगदानातून थेट मदत करण्याचा ठराव सर्वानुमते पारित झाला.

वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या निर्णयात सक्रिय सहभाग नोंदवत आर्थिक मदत केली. तसेच पूरग्रस्तांसाठी ‘मानसिक आधार प्रकल्प’ हाती घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीत जिल्हानिहाय व विभागनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. वर्धा जिल्ह्याचा अहवाल जिल्हा कार्यवाह रजनी गजेंद्र सुरकार यांनी सादर केला. यावेळी मंचावर सारिका डेहनकर, प्रकाश कांबळे, डॉ. हरिश पेटकर, डॉ. माधुरी झाडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवसांच्या या कार्यकारिणीचा समारोप रविवार, २८ सप्टेंबर रोजी झाला. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करून आगामी उपक्रमांचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव राजेश देवरुखकर यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी सुशीला मुंडे, मच्छिंद्रनाथ मुंडे, उत्तम जोगदंड, नंदकिशोर तळाशीलकर, ॲड. तृप्ती पाटील, मुकुंद देसाई, शरद लोखंडे, नितिन वानखेडे, दिवेंद्र मोरे, मंगल मोरे, भाग्यश्री भडांगे, गुलाब सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here