विभागीय आयुक्तांच्याहस्ते पवनार येथील पांदनरस्त्याचे भुमिपूजन! लोकसहभागातून 3.5 किमीचा पांदनरस्ता; परिसरातील 170 शेतकऱ्यांना रस्त्याचा लाभ

वर्धा : राजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री पांदन रस्ता योजनेतून महसूल प्रशासन व लोकसहभागातून पवनार येथील केदोबा या पांदनरस्त्याचे काम करण्यात येत आहे. या कामाचे भुमिपूजन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्याहस्ते आज झाले.

यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, पवनारच्या सरपंच शालिनीताई आदमने, पवनार येथील तलाठी तसेच उपविभागीय अध्यक्ष श्री भोयर यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात पांदन रस्त्यांवरील अतिक्रमन काढून हे रस्ते मोकळे करण्याचा कार्यक्रम मोठया प्रमाणावर हाती घेण्यात आला आहे. ठिकठिकाणी या रस्त्यांची कामे सुरू आहे.

पवनार येथील केदोबा या पांदनरस्त्याचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात आले आहे. एकून 3.5 किलोमीटर लांबीचा हा रस्ता असून रस्त्याची रुंदी 22 फुट आहे. या रस्ता मोकळा झाल्यानंतर परिसरातील 170 शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी या रस्त्याचा लाभ होणार आहे.

रस्त्याच्या कामासाठी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून जेसीबी प्राप्त झाले असून त्याला लागणारे डिजेल पवनारच्या नागरिकांनी लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिले आहे.
पांदनरस्त्याचे काम करतांना दोन्ही बाजुला नालीचे खोदकाम करण्यात येणार आहे. नाली खोदकामात निघालेली माती रस्त्यावर टाकुन रस्ता मजबूत करण्यात येतील. रस्त्यावरील संपुर्ण अतिक्रमन काढून टाकले जाणार असल्याने वहिवाटीसाठी हा रस्ता पुर्णपणे मोकळा होणार आहे.

सुरूवातीस पवनार येथील शेतकरी शामरावजी भट यांच्याहस्ते पूजन व कुदळ मारुन भुमिपूजन करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व सरपंचांनी पुजन करुन रस्ता बांधकामास सुरुवात केली. तत्पूर्वी विभागीय आयुक्तांनी पवनार येथील लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या केदोबा या पांदनरस्त्याची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here