अँग्रो कंपनीच्या बॅकफिडिंगनेच कंत्राटी कामगाराचा मृत्यू ! नागरिकांत संतापाची लाट : पोलिस चौकीसमोर नागरिकांची उसळली गर्दी

वायगाव (निपाणी) : येथील विद्युत वितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान बुधवारी दुपारी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा अपघात येथील संस्कार अग्रो कंपनीतील जनरेटरच्या बॅकफिडिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालावरून समोर आल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली. त्यांनी महाविरतण कार्यालय, अग्रो कंपनीसह पोलिस चौकीसमोर गर्दी करून मदतीची मागणी रेटून धरली होती. सौरभ दिलिप शेंडे असे मृताचे नाव असून त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्‍त होत आहे.

बुधवारी विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असताना तीन ते चार तास विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची सूचना देण्यात आली होती. काम सुरु असल्याची सूचना दिली होती. तरीही संस्कार अँग्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जनरेटर सुरू केल्याने विद्युत प्रवाह संचारला आणि कंत्राटी कामगार सौरभ दिलीप शेंडे (२८, रा. वायगाव) याचा मृत्यू झाला. त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई द्यावी, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे वायगावात तणावाचे वातारण निर्माण झाले होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्‍वर यांनी वायगाव पोलिस चौकी गाठली. सोबतच नागरिकांचा रोष बघता माजी खासदार रापदास तडसही पोलिस चौकीत पोहोचले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अखेर म्रिलींद भेंडे यांच्या मध्यस्थीनंतर पोलिस, महावितरण अधिकारी व अँग्रो कंपनी अधिकारी व मृतांच्या परिवारातील सदस्य यांच्यात चर्चा झाली. महावितरणने मदतीची घोषणा करून अँग्रो कंपनीकडून दहा लाखांच्या मदतीचा थनादेश देण्यात आला. नंतर मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here