

समुद्रपूर : तालुक्यातील मौजा गोविंदपूर येथे गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या धडाकेबाज कारवाईत भरारी पथकाने HTBT कापूस बियाण्याचे २० पॅकेट्स जप्त केले. रात्री ११.४० वाजता पार पडलेल्या या कारवाईत एकूण ९ किलो वजनाचे, अंदाजे २८ हजार रुपयांचे अनधिकृत बियाणे हस्तगत करण्यात आले. ईश्वर महादेव पेंदे यांच्या ताब्यात अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद HTBT बियाण्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाल्यानंतर तात्काळ छापा टाकण्यात आला. यामध्ये बेकायदेशीर साठा उघड झाला.
सदर कारवाई जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत संदीप ढोणे (मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा), प्रमोद पेटकर (गुण नियंत्रण निरीक्षक, वर्धा), महेंद्र डेहणकर (कृषी अधिकारी, पंचायत समिती समुद्रपूर), तसेच पोलीस हवालदार घनश्याम लांडगे, सत्यप्रकाश इंगळे आणि स.पो.नि. रविंद्र रेवतकर (पोलीस स्टेशन, समुद्रपूर) यांनी सहभाग घेतला. सध्या पोलीस पुढील तपास करत असून, या बियाण्यांचा स्रोत आणि पुरवठादाराचा शोध घेतला जात आहे.