

वर्धा : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत मध्यप्रदेशातील आरोपीला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ७ लाख ९४ हजार २३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२१ मार्च रोजी फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह पुण्यावरून नागपूरकडे ट्रॅव्हल्सने जात होती. वर्धा जिल्ह्यातील विरुळ येथील पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रॅव्हल्समध्ये आई-वडील बाथरूमला गेले असता त्यांच्या सीटवरील बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. त्या बॅगेत दोन मंगळसूत्र, पोहेहार, झुंबर व रिंग अशा ३.४२ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज होता. पुलगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान (वय ३४, रा. खैरवा, जि. धार, मध्यप्रदेश) याचे नाव पुढे आले. सदर आरोपी सध्या कर्नाटकातील चित्रदुर्ग जेलमध्ये शिक्षा भोगत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळसूत्र (५३.४२ ग्रॅम) – ₹४,४५,२८०
पोहेहार (११.२२ ग्रॅम) – ₹१,०३,२२४
मंगळसूत्र (२५.३० ग्रॅम) – ₹१,७७,५६०
झुंबर व रटॉप्स (६.८१ ग्रॅम) – ₹६२,६५२
दोन रिंग (०.६० ग्रॅम) – ₹५,५२०
एकूण जप्त मुद्देमाल – ₹७,९४,२३६ रुपये.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर अधीक्षक सागर कवडे, व उपविभागीय अधिकारी (IPS) राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पो.उप.नि. राहुल इटेकर, सदानंद वडतकर, तसेच स.फौ. संतोष दरगुडे, पो.हवा. धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, अक्षय राऊत, पवन पन्नासे, अमोल बरडे, अतुल भोयर, मोहम्मद गौरवे, हर्षल सोनटक्के यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.उप.नि. वडतकर करीत आहेत.