
वर्धा : रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष देत दोघांकडून ३ लाख ९० हजार रुपयांची रक्कम उकळून त्यांची फसवणूक केली. ही घटना पुलगाव शहरात उघडकीस आली. याप्रकरणी पुलगाव पोलिसात १७ रोजी तक्रार दाखल केली असून आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
अजय दादाराव घोडेस्वार (४३) रा. वॉर्ड क्र. ३ पुलगाव याची ओळख आरोपी राम अन्ना आटे रा. गाडगेनगर पुलगाव याच्याशी होती. अजय हा नोकरीच्या शोधात होता. दरम्यान आरोपी राम याने अजयला १० मार्च २०२२ रोजी तुला रेल्वेत नोकरी लावून देतो तसेच तुझ्या मित्रालाही रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगितले. मात्र, नोकरी लाऊन देण्यासाठी पैसे मोजावे लागतील, अशी अट त्याने ठेवली. नोकरी लागणार असल्याचे आमिषातून अजय घोडेस्वार आणि त्याच्या मित्राने आरोपी राम आटे याला ३ लाख ९० हजार रुपयांची रक्कम दिली.
आरोपी रामने रक्कम स्विकारुन काही दिवसांत तुम्हाला नोकरीसाठी कॉल येईल, असे सांगितले. मात्र, कुणाचाही कॉल आला नाही तसेच आरोपी रामला याबाबत विचारणा केली असता तो देखील टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाल्याचे समजताच अजय घोडेस्वार याने पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

















































