

समुद्रपूर : तालुक्यातील पिंपळगाव आणि धोंडगाव येथे बुधवारी २५ रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मान्सूनपूर्वी पावसासह वादळाने चांगलाच तांडव घातला. वादळाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या १७ गोठ्यांचे नुकसान झाले असून, १० घरांची छते उडाल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मुकसान झाले.
बुधवारी २५ रोजी तालुक्यातील पिंपळगाव आणि धोंडगावात वादळासह पावसाने हजेरी लावली. पिंपळगाव येथील हनुमान मंदिरालगत शिवदास सडमाके यांच्या घरावर वडाच्या झाडाची फांदी कोसळली. यावेळी घरातील सदस्य थोडक्यात बचावले. मात्र, घराच्या छताचे नुकसान झाले. कवेलूचे छत कोसळल्याने जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली. अशोक घोडाम यांच्या घराचे छत कोसळून घरात बांधून असलेल्या शेळ्या छताखाली दबल्या. बाबाराव देवतळे यांच्या सिमेंट घराचे छत जुन्या कवेलू घरावर कोसळल्याने पूर्णतः घर जमीनदोस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. सुरेश किन्नके, हनुमान धोटे यांच्या घराच्या भिंती वादळ आल्याने कोसळल्या. आनंद कुटे आणि भारताबाई गुरनुले यांच्या घराची टिनाची छते उडाली. झोपडपट्टी परिसरातील रहिवासी भीमराव तेलंग, केशव भगत, गणेश घुमडे, मधुकर कुटे, रमेश कुटे, आनंद कुटे, दीपक भगत, प्रमोद धोटे, महादेव कुटे, उमेश कोरेकर तसेच धोंडगाव येथील विजय मुनेश्वर, कवडू थुटे आदींसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मान्सूनच्या सुरुवातीलाच या संकटाचा सामना करावा लागला. नुकसानीचा पंचनामा करून तातडीने भरपार्ड देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.