

वर्धा : तुम्ही मोबाइल अँपच्या मदतीने ऑनलाइन कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर जरा सावध व्हा. कारण, कर्ज घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी नाहक त्रास दिल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. यात प्रामुख्याने चायनीज अँप डाऊनलोड करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांत आर्थिक उलाढाल ठप्प झाली. उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाल्याने मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे आर्थिक गणित बिघडले. परिणामी फायनान्स कंपन्यांसह खासगी सावकारांनी सर्वसामान्यांची लूट लावली. यातच भर म्हणून आता काही चायनीज कंपन्यांनी ऑनलाइन झटपट कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे. कर्ज घेतल्यानंतर अनेकांना अज्ञातांनी नाहक त्रास दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कर्जाची परतफेड केल्यानंतरही कर्जदाराला त्रास दिला जातो. सायबर चोरटे महिलांसह तरुणांना टार्गेट करीत असल्याचे दिसून येत आहे.