
वर्धा : क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात ब्लेडने व्यक्तीचा गळा चिरून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिंगणघाट येथील नेहरू वॉर्ड परिसरात २६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी २७ रोजी मृत्युपूर्व जबाबावरून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
विजय हिरालाल पांडे (रा. नेहरू वॉर्ड असे जखमीचे नाव आहे. विजयची पत्नी घरगुती कारणातून त्याच्या जवळ न राहता विभक्त राहते. या कारणातून आरोपी पिंटू वसंत गुंड आणि केश्या नामक युवक हे दोघे त्याची गंमत करून तू तुझ्या बायकोला ‘पोसत नाहीस म्हणून तुझी बायको तुला सोडून गेली, असे म्हणून चिडवित होते. विजयने त्यांना हटकले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पिंटू गुंड याने जवळील ब्लेडने विजयच्या गळ्यावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.


















































