

वर्धा : मुंबई येथील भिवंडी येथून ट्रान्सपोर्ट कंपनीतून औषधांचे बॉक्स नागपूरकडे घेऊन जात असताना वाहनचालक आणि क्लिनरने १ लाख ८० हजार रुपयांच्या ८७ औषधांच्या बॉक्सची परस्पर विक्री करून अपहार केल्याची तक्रार तळेगाव श्यामजीपंत पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आली आहे.
मुंबईतील भिवंडी येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीतून औषधांचे ४९८ बॉक्स हे ०१४५ क्रमांकाच्या वाहनात भरून चालक दुर्गेशकुमार कुंदनलाल रघुवंशी आणि क्लिनर प्रेमलाल गजनलाल सयाम हे मुंबईवरून नागपूर येथे जाण्यासाठी निघाले होते. नाशिक आणि औरंगाबाद येथे काही औषधांचे बॉक्स उतरवून ते उर्वरित बॉक्स घेऊन नागपूरकडे रवाना झाले. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुर्गेशकुमार याने सुनीलकुमार पटेल याला फोन करून गाडीचे सील व सेंटर लॉक तुटलेले असून तळेगाव येथील इंदरमारी फाट्याजवळ वाहन उभे करून ठेवल्याची माहिती दिली. सुनीलकुमार आणि निखील डवरे (दोघे रा, नागपूर) यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून औषधांच्या बॉक्सची मोजणी केली असता त्यात ८७ औषधांचे बॉक्स दिसून आले नाहीत. हे बॉक्स चालक आणि क्लिनरने परस्पर विक्री करून अपहार केल्याची तक्रार सुनीलकुमार यांनी तळेगाव पोलिसांत दाखल केली. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.