

वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा च्यावतीने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासासाठी प्रकल्पातंर्गत व्यवसाय विकासाकरीता समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांनी 31 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे. प्रकल्पातील लाभार्थी हे समुदाय आधारितशेतक-यांच्या संस्था असणार आहे.
सदर अर्ज शेतमाल, शेळया आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्य साखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी असणार आहेत. मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीकडे नोंदणी प्रमाणपत्र असावे. शेतकरी उत्पादक भागीदारी उपप्रकल्पातील 250 भागधारक असावेत, एका वर्षात 5 लक्ष रुपयापेक्षा जास्त उलाढाल असावी. खरेदीदारासोबत सामंजस्य करार पुर्ण करणा-या शेतकरी उत्पादक कंपन्या अर्ज करु शकतात.
प्रकल्पातंर्गत एकुण मुल्याच्या 60 टक्के रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येणार आहे. 40 टक्के शेतक-यांचा स्वहिस्सा असणार आहे. त्यामुळे कमी आर्थिक गुंतवणुक लागणारे व त्याबाबत आपल्या अवाक्यात असलेले व्यवसाय प्रकल्प अहवाल तयार करुन प्रकल्पातंर्गत निकषाची पुर्तता करणारे जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी यांनी अर्जाची नोंदणी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कडे करावी, असे आत्माच्या वतीने कळविण्यात येत आहे.