

वर्धा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना व महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्यातील 68 हजार आशा व 4 हजार गट प्रवर्तक आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदे समोर सोमवार (ता. १४) थाळीनांद करुन केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधन्यासाठी आंदोलन आयटक व सिटूच्या वतिने करण्यात आले. आंदोलनांचे नेतृत्व आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे सिटूचे अर्चना घुगरे यांनी केले.
मागण्याचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रा ज पराडकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या नावाने देण्यात आले. महाराष्ट्रात शहरी व ग्रामिण भागात कोवीड १९ लसीकरणांतर्गत आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्तीने काम लावण्यात येत आहे. याबाबत कोणताही मोबदला आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांना दिला जात नाही. आशा स्वंयसेविकांची नेमणुक कामावर आधारीत मोबदला या तत्वानुसार करण्यात आलेली आहे.
कोवीड १९ च्या कामासाठी केंद्र शासनाकडुन मिळणारा एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता ऑक्टोंबर २०२१ पासुन देण्याचे बंद करण्यात आला होता तो पुर्ववत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत. सकाळ पासुन संध्याकाळपर्यंत कोवीड १९ च्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आशा स्वयेसेविकांना व गटप्रवर्तकांना त्यांची मुळ कामे करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना दरमहा कोवीड काळात मिळत असलेल्या मोबदल्यापेक्षा सध्या खुप कमी मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांचे न भरून निघणारे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांना मिळणारा तुटपुंजा मोबदलाही वेळेवर दरमहा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
त्यामुळे शासन व प्रशासनाप्रती त्यांच्या भावना संतप्त होवुन आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष देवुन आशा स्वयसेविका व गटप्रवर्तकांचे ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या चार महिन्याचे थकीत मानधन त्वरीत देवुन येथुन पुढे दरमहा पाच तारखेपर्यंत मानधन देण्याची व्यवस्था करावी. अशी आमची प्रमुख मागणी आहे.