

तळेगाव (श्या.पंत.) : वाढदिवसासाठी विविध साहित्य खरेदी केल्यावर दुचाकीने परतीच्या प्रवास करणाऱ्यांना भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्या. नागपूर-अमरावती मार्गावरील चिस्तुर नजिक सोमवारी रात्री ७.३० वाजता हा अपघात झाला. अंकुश सुरेश खासबागे असे मृत व्यक्तीचे नाव असून रेणुका खासबागे व लावण्या खासबागे असे गंभीर जखमींची नावे आहेत.
चिस्तुर येथील अंकुश सुरेश खासबागे, रेणुका खाजबागे तसेच अकरा वर्षीय लावण्या खासबागे हे तिघे लावण्याच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव (श्या.पंत.) येथे केक, तोरड्या तसेच इतर साहित्य खरेदीसाठी आले होते. खरेदी पूर्ण झाल्यावर हे तिघे एम. एच. २७ डी. बी. ८२५३ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी चिस्तूर नजीक यादव ढाब्याजवळ आली असता अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात अंकुश खाजबागे (3५) यांचा मृत्यू झाला तर रेणुका खाजबागे (३०) तसेच लावण्या खाजबागे (११) ही जखमी झाली.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. लावण्या तसेच रेणुका यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात तळेगाव पोलीस करीत आहेत.