पाच वर्षे ‘ईडी’वाले झोपले होते का? अजित पवारांच्या कारवाईनंतर राजू शेट्टी भडकले

मुंबई : राज्यातील ४२ साखर कारखाने विकत घेतल्याच्या प्रकरणात घोटाळा, भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पाच वर्षापूर्वी दिली होती. आता केवळ राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी त्याचा वापर करताना पाच वर्षे ईडी, आयकर विभाग झोपले होते का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व कारखान्यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीकडे आग्रह धरावा अशी मागणीदेखील त्यांनी केली. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्रीत घोटाळा झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विक्री झालेल्या ४२ कारखान्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. माजी खासदार शेट्टी यांनी पत्रकार बैठक घेत सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांची दौलत लुटल्याचा आरोप केला. आता जर पडद्यामागे काही हालचाली होऊन चौकशी थांबली तर चौकशी करणाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशाराच दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, ‘राज्यातील ४२ कारखान्यांच्या विक्रीत घोटाळा झाल्याने त्याची चौकशी करावी म्हणून पाच वर्षापूर्वी आपण ईडी, आयकर, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली. पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. पण या सर्वांकडून पाच वर्षात काहीच झाले नाही. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेथेही एक दोन सुनावणीनंतर पुढे काहीच झाले नाही. आता मात्र राजकीय सोयीसाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. पाच वर्षे हा विभाग झोपला होता का?’ असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांची दौलत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लुटली आहे. या सर्वांचीच चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. सुडबुद्धीने आणि एकमेकांचा बदला घेण्यासाठी एखाद्याची चौकशी करण्यापेक्षा सर्वांचीच चौकशी करायला हवी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे निर्भिड आणि स्वच्छ आहेत. त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून सर्व कारखाना विकत घेतलेल्या सर्व नेत्यांची चौकशी करण्यास ईडीकडे आग्रह धरावा’ अशी मागणी शेट्टी यांनी केली.

‘कारखान्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे आठ हजार कोटी रूपये बुडाले. एकाही शेतकऱ्याचे शेअर्स, ठेवी, कामगारांचा पगार आणि वाहतूकरांचे भाडे मिळाले नाही. पण विकत घेणाऱ्यांनी भरपूर कमवले. ज्या कंपन्या यामध्ये आहेत त्याचे भागीदार कोण आहेत, त्यांच्याकडे अचानक एवढा पैसा कुठून आला याची चौकशी करायला हवी. कुणाला अद्दल घडविण्यासाठी आम्ही याबाबत तक्रार केली नाही. शेतकऱ्यांचे कारखाने त्यांना परत मिळावेत हीच आमची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत लढत राहणार’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

ईडीने आता चौकशी सुरू केली आहेच. पण ती सर्वांचीच करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आता एकमेकांच्या घरावर दगड मारण्यास सुरूवात केली आहे. यातून अनेकांचा बुरखा टराटरा फाटणार आहे. अनेकांची लायकी कळणार आहे, असाही घणाघात राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here