संकटकाळात झाले ‘रेकॉर्ड ब्रेक’ पीककर्ज वाटप

वर्धा : मागील सहा आर्थिक वर्षांचा विचार केल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याची नोंद अग्रणी बँकेने घेतली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील ७० हजार १५२ शेतकऱ्यांना विविध बँकांकडून पीककर्ज म्हणून ७३८.९४ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा कर्जमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानेच सर्वाधिक पीककर्ज वितरित झाल्याचे सांगण्यात आले.

खरीब किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवून पीककर्ज मिळवितात. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला त्यासाठी सुरुवातीला विविध कार्यालयात जावून आवश्यक कागदपत्र गोळा करावे लागतात. हीच कागदपत्रं सादर केल्यावर कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यावर यापूर्वी कुठले कर्ज आहे काय, याची शहानिशा केल्यावरच त्याला पीककर्ज योजनेस पात्र ठरवून त्याच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वळती केली जाते.

जिल्ह्यात अडीच लाखांच्यावर शेतकरी असून, बहुतांश शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीक कर्ज घेतात. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्धा जिल्ह्याला पीककर्ज वाटपाचे १०२८.९६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी जिल्ह्यातील तब्बल ७० हजार १५२ शेतकऱ्यांना पीककर्जापोटी ७३८.९४ कोटींची रक्कम वितरित केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना पीककर्ज वेळीच मिळाल्याने दिलासा मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here